ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

मागोवा – कराड दक्षिण एकहाती काॅंग्रेसचा बालेकिल्ला

विशाल वामनराव पाटील

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आजही अभेद्य राहिला आहे. यंदाची 2024 सालची विधानसभा निवडणूक चुरशीची असून प्रचाराने आतापासूनच रंगत घेतली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे कार्यकारणी प्रदेश सदस्य डाॅ. अतुल भोसले हे दोघे तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. या मतदार संघाचे यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील- उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी नेतृत्व केले आहे.

राज्याच्या राजकारणात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. 1972 आणि 1978 ला यशवंतराव मोहिते, 1980 ते 2014 सलग 35 वर्षे विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांनी दीर्घ काळ नेतृत्व केले. गेल्या 10 वर्षापासून आ. पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करत आहेत. या मतदार संघात विलासराव पाटील- वाठारकर यांनी तीनवेळी तर इंद्रजित मोहिते यांनी दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना विजयी होता आले नाही.

सन 1972 साली यशवंतराव मोहिते यांना 34 हजार 397 तर शंकरराव मोहिते यांना 29 हजार 980 मते मिळाली. या निवडणुकीत अवघ्या 4 हजार 417 मतांनी काॅंग्रेसचे यशवंतराव मोहिते विजयी झाले. 1978 साली पुन्हा दोन्ही उमेदवार आमनेसामने निवडणूक लढले. तेव्हा 26 हजार 657 मतांनी यशवंतराव मोहिते यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

विलासकाका पर्व

विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांनी पहिल्यांदा 1980 साली काॅंग्रेसकडून (43 हजार 348 मते) निवडणूक लढवली. यावेळी त्याच्या विरोधात काले गावचे भिमराव पाटील अपक्ष (22 हजार 586 मते) निवडणूक रिंगणात उभे होते. तर बाळकृष्ण निकम यांनी काॅंग्रेस आय मधून 11 हजार 78 मते मिळवली. यावेळी 20 हजार 762 मतांनी विलासकाका विजयी झाले. 1985 साली दुसऱ्यांदा काकांनी 54 हजार 159 मते घेतली तर त्याच्या विरोधात विलासराव पाटील- वाठारकर (बापू) यांनी 42 हजार 390 मते घेतली. विलासकाका दुसऱ्यांदा विधानसभेत 11 हजार 769 मतांनी विजयी झाले. काकांनी 1990 साली विजयी हॅट्ट्रीक मारली. यावेळी 64 हजार 100 मते मिळाली. तर विरोधातील अपक्ष उमेदवार इंद्रजित मोहिते यांना 32 हजार 643 मते आणि शिवसेनेचे चंद्रकांत पवार यांना 10 हजार 137 मते मिळाली. काकांनी 31 हजार 457 मतांच्या मताधिक्यांनी तिसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

कराड दक्षिणेत 1995 साली काका आणि इंद्रजित मोहिते यांच्यातच लढत झाली. यामध्ये काकांना 69 हजार 386 मते तर मोहितेंना 48 हजार 14 मते मिळाली. काका चाैथ्यांदा विधानसभेत 21 हजार 372 मतांनी विजय झाले. 1999 साली विलासकाका यांना 62 हजार 795 मते मिळाली. विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विलासराव पाटील- वाठारकर यांनी 39 हजार 161 मते घेतली. या निवडणुकीत शिवसेनेने अशोक भावके (14 हजार 703 मते) यांना उमेदवारी दिली होती. काकांनी पाचव्यांदा विजय मिळवला, यावेळी 23 हजार 634 मतांनी विजय मिळवला.

काकांचा विक्रमी विजय 

विलासकाका यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय 2004 सालच्या निवडणुकीत विजय मिळवला. तब्बल 95 हजार 453 मतांनी विजय मिळवत विरोधातील सर्व पाचही उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त केले. या निवडणुकीत एकूण 1 लाख 28 हजार 907 मतांपैकी 1 लाख 8 हजार 367 मते काकांनी मिळाली. विरोधात दोन नंबरचे उमेदवार असलेले कमलाकर सुभेदार (शिवसेना) यांना अवघी 12 हजार 914 मते मिळाली होती. यानंतर काकांचा शेवटचा विजय 2009 साली झाला. यावेळेस सुपने- तांबवे जिल्हा परिषद गट आणि कुंभारगाव जिल्हा परिषद गट पाटण विधानसभा मतदार संघाला जोडला गेला. तांबवे आणि कुंभारगाव हे दोन्ही गट काकांचे हक्काचे होते. 2009 साली काकांना 82 हजार 857 मते तर विरोधात अपक्ष असलेल्या विलासराव पाटील- वाठारकर यांना 67 हजार 944 मते मिळाली. यावेळी भरत पाटील (9 हजार 784 मते) हे भाजपामधून निवडणूक रिंगणात होते. काकांचा 14 हजार 913 मतांनी विजय झाला.

पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले संघर्ष 

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात बदल झाला अन् काही अनपेक्षित घटना घडल्याने 2014 सालची निवडणूक चांगलीच रंगतदार झाली. यामध्ये सलग 7 वेळा विजयी होणाऱ्या विलासकाकांना अपक्ष निवडणूक रिंगणात उतरावे लागले. अचानक मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज बाबांना कराड दक्षिणचे तिकिट मिळाले. तर काॅंग्रेस विचारांच्या दोन उमेदवारांच्या विरोधात अतुल बाबांना भाजपकडून तिकिट मिळाले. या निवडणूकीत पृथ्वीराज चव्हाण यांना 76 हजार 831, विलासराव पाटील- उंडाळकर यांना 60 हजार 413 तर अतुल भोसले यांना 58 हजार 621 मते मिळाली. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण 16 हजार 148 मतांनी विजयी झाले.

सन 2019 साली पुन्हा काका- बाबा आणि भोसले अशी तिरंगी लढत झाली. यावेळी मात्र विलासकाका निवडणूक रिंगणात नव्हते तर त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे निवडणूकीला सामोरे जात होते. यावेळी दोन बाबांच्या जोरदार लढत झाली. यात पृथ्वीराज चव्हाण (काॅंग्रेस)- 92 हजार 296 मते, अतुल भोसले (भाजप)- 83 हजार 166 मते आणि उदयसिंह पाटील- उंडाळकर- 29 हजार 401 मते मिळाली. यात 9 हजार 130 मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली.

(पुढील भागात पाटण मतदार संघाचा मागोवा)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker