कोयना वसाहतीत बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला : 7 तोळे सोने लंपास

कराड :- कराड शहराजवळील कोयना वसाहत येथील एक कुटुंब परगावी गेलेले असताना चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सुमारे पाच लाखाचे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. कोयना वसाहत येथील दत्त अपार्टमेंटमधील ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत विलास अप्पा दंडवते यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथील दत्त अपार्टमेंटमध्ये विलास दंडवते हे पत्नी व मुलासमवेत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा पुणे येथील एका कंपनीत नोकरीला असून ११ मे रोजी विलास दंडवते हे मुलगा आणि पत्नीसोबत पुण्याला गेले होते. त्यानंतर १६ मे रोजी विलास दंडवते हे एकटेच कोयना वसाहत येथील फ्लॅटमध्ये आले. काही वेळ फ्लॅटमध्ये थांबून पुन्हा ते फ्लॅटला कडी-कुलूप लावून पुण्याला गेले. तेथून मंगळवारी ते सोलापूरला व मध्यरात्री सोलापूरहून परत कोयना वसाहत येथे आले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते फ्लॅटमध्ये पोहोचले असताना लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा व कुलूप त्यांना तुटलेले दिसते. तसेच मुख्य दरवाजाचा कोयंडाही तोडण्यात आला होता.
विलास दंडवते यांनी तातडीने घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाटात असलेले साहित्य विस्कटले होते. तसेच कपाटाचा ड्राव्हर उघडा होता. त्यामध्ये असणारी चांदीची भांडी, चांदीचा करंडा, चांदीची गणपती मूर्ती तसेच चांदीची नाणी व रोकड चोरीस गेल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता तेथील कपाटातील सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्याचे त्यांना दिसून आले.
पाच लाखांचा ऐवज पळवला
विलास दंडवते यांच्या घरातून २ लाख १० हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, ९० हजार रुपयांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, ३० हजार रुपयांचे अर्धा तोळ्याचे कानातील झुमके, ९० हजाराच्या दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, १५ हजाराची एकुण ३०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, गणपती मूर्ती, चांदीची नाणी, करंडा तसेच तीस हजार रुपयांची रोकड असा सुमारे पाच लाखाचा ऐवज चोरीस गेल्याचे पोलिसांनी सांगितले.