नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात दोघांवर कराड पोलिसात गुन्हा

कराड । नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासुवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत विवाहितेची आई मिना अरुण कांबळे (रा. रविवार पेठ, बीड) यांनी फिर्याद दिली. पती अनिकेत अंकूश माने व सासू राणी अंकूश माने (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगीतले की, बीड येथील निलम हिचा विंग येथील अनिकेत माने याच्याशी 9 मार्च 2023 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर सासू व पतीने निलमला चांगली वागणूक दिली. मात्र, काही दिवसानंतर त्यांनी तीचा शारीरीक व मानसिक छळ सुरू केला. घरातील किरकोळ कारणावरुन ते निलमला त्रास देत होते. याबाबत निलमने आईला फोन करुन सांगीतले होते. चप्पलचे दुकान घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सासू राणी माने व पती अनिकेत माने हे दोघेजण निलमला वारंवार शिविगाळ करुन मारहाण करीत होते. या त्रासाला कंटाळून निलम हिने विंग येथील राहत्या घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
निलमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत माने व सासू राणी माने या दोघांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर विंग गावात तसेच कराड तालुका पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण होते. निलम हिच्या घरच्यांनी आक्रमक पवित्रा घेत सासरच्या घरासमोर अंत्यविधीची मागणी केली होती. परंतु कराड तालुका पोलिसांनी निलम हिच्या माहेरच्यांना शांत करून पती व सासूवर गुन्हा दाखल केला आहे.