Satara News : पर्यटनाला गेलेल्या पतीला 6 जणांकडून बेदम मारहाण

पाटण। पाटण तालुक्यातील सडावाघापूर पठारावर फिरायला गेलेल्या दाम्पत्याबाबत संतापजनक प्रकार घडला. युवकांच्या जमावाने पत्नीकडे पाहून आरडाओरडा केल्यामुळे पतीने त्याबाबत जाब विचारायला गेला असताना, संबंधित युवकांनी त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सातारा तालुक्यातील एका गावातील पती- पत्नी दुचाकीने सडावाघापूर पठारावर फिरण्यासाठी गेले होते. पवनचक्कीजवळ उभे राहून ते दोघेजण सेल्फी घेत असताना 5 ते 6 युवक पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा करु लागले. त्यामुळे पतीने त्याठिकाणी जावून संबंधित युवकांना जाब विचारला. मात्र, त्यावरुन चिडून जावून त्या युवकांनी पतीला बेदम मारहाण केली. तसेच पतीला मारहाण करु नका, असे म्हणून भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. या मारहाणीत पती जखमी झाला.
याबाबत मल्हारपेठ पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आनंद आव्हाड करत आहेत. सध्या पावसाळा असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबा समवेत पर्यटनसाठी जात आहेत. अशात अशा हुल्लडबाज तरूणांच्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. त्यामुळे अशा हुल्लडबाज करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.