कराड- पाटण मार्गावर अपघातात तांबवेतील दूध विक्रेता जागीच ठार

कराड | कराड- पाटण मार्गावर मध्यरात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कराडहून पाटणच्या दिशेला जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हणमंत (बाळासाहेब) रघुनाथ पाटील (वय- 52, रा. तांबवे, ता. कराड) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडहून तांबवे या आपल्या गावी निघालेल्या बाळासाहेब पाटील यांना आरटीओ कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेनंतर संबधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदरील घटना समजताच तांबवे येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कराड शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघातात दुचाकी गाडी क्रमांक (एमएच- 11- व्ही- 5417) असे नुकसान झालेल्या दुचाकीचा नंबर आहे.
बाळासाहेब पाटील हे कराड, मलकापूर शहरासह परिसरात घरोघरी जावून दूध विक्री करण्याचे काम करतात. रात्री उशिरा दूधाचे कॅन दुचाकीला बांधून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीच्या पुढील भागाचा काही भाग तुटलेला आढळून आला, तसेच डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.



