जर्मनीहून आणलेल्या शासनाच्या LED लाईटची दिड महिन्यापूर्वी चोरी : कुंपणच शेत खातयं का?
मसूर प्रतिनिधी । गजानन गिरी
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रेल्वे प्रशासनाने मसूरच्या रेल्वेच्या उड्डाणपुलावरील कमानीवर सुशोभीकरणासाठी जर्मनीहून आणलेली अडीच लाख रुपये किमतीची एलईडी लाईट चारच दिवसात गायब झाली आहे. लाईटची चोरी दिड महिन्यापूर्वी होवूनही याबाबतची तक्रार अजूनही पोलिसात दाखल झाली नाही. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जागरूक नागरिकांमुळे हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. या चोरीची कुठेच नोंद नसल्याने आणि हे प्रकरण दाबले जात असल्याने नक्कीच कुंपणच शेत खातयं असा तर प्रकार नाही ना?
पंढरपूर- मल्हारपेठ या मार्गावर मसूरजवळ असलेला उड्डाणपुलाचा विषय अनेक कारणांनी गाजला होता. त्यातच एलईडी लाईट गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उड्डाणपूलाला समस्यांचे लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही, असेच एकंदरीत निदर्शनाला येत आहे. या पुलावरील चोरी कोणी केली, त्याची नोंद का नाही. नक्की ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांचे साटेलोटे तर नाही ना? की शासनाला चुना लावला जातोय असे अनेक प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करू लागले आहेत. तसेच संबधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चाैकशी होणार का?
मसूरच्या उड्डाणपुलाचे काम चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले. तरीही पुलाचे उद्घाटन न झाल्याने पुलावरून वाहतूक सुरू नव्हती. उद्घाटनाचा राजकीय श्रेयवाद चांगलाच रंगला होता. रेल्वेगेटवरच्या वाहतूक कोंडीच्या त्रासाने ग्रामस्थ, वाहनधारक, प्रवासीवर्ग त्रासला होता. अखेर विभागातल्या ग्रामस्थांनीच चार दिवसांपूर्वीच उद्घाटनाचा नारळ फोडला अन् उड्डाण पुलावरची वाहतूक सुरू झाली. परंतु दीड महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उड्डाणपलावर अडीच लाख रुपये किमतीची तिरंगा लाईट एलईडीच्या स्वरूपात बसविली होती, सदरची एलईडी लाईट चार दिवसात गायब झाली असल्याचे ग्रामस्थांना समजले. या चोरीच्या प्रकारामुळे अधिक माहिती ग्रामस्थांनी घेतली असता, चोरी झाली मात्र त्यांची कुठेच नोंद नसल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. या प्रकाराबाबत उपसरपंच विजयसिंह जगदाळे, रवी जाधव, जितेंद्र निकम, कासम पटेल, हिमांशू शहा, शिकंदर शेख, प्रताप जगदाळे यांनी याबाबत संबधितांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
जर्मनीवरून नवी लाईट येणार पण चोरीचे काय?
उड्डाणपलावरची एलईडी लाईट गायब झाली. मात्र रेल्वे प्रशासन व एलईडी लाईट बसविणाऱ्या कंत्राटदारांनी अजुन पोलिसात तक्रार दाखल केली नाही. याबाबत मोठे गौंडबंगाल असल्याबाबतची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. या पुलावर पुन्हा एलईडी लाईट आणली जाणार असून त्याची आर्डर संबधित कंपनीला दिली आहे. आता जर्मनीहून कंपनीचा माणूस येवून लाईट बसविण्यासाठी 3 महिने लागणार असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, चोरीला गेलेल्या लाईटबाबत काय झाले, चोर कोण अन् महत्वाचे अजूनही चोरीची तक्रार का केली जात नाही, असा सवाल उपस्थित राहत आहे.