पटकथा लेखनासाठी कार्यशाळा म्हणजे निव्वळ थोतांड : प्रताप गंगावणे
मसूर येथे प्रकट मुलाखतीत दिलखुलास फटकेबाजी
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
जो उत्तम कथा लिहितो, तो उत्तम पटकथा लिहू शकतो. त्याची कसली आलीय परिभाषा? आपल्या क्षेत्रात कोणी येऊ नये म्हणून नाहक त्याचा बाऊ केला जातो. त्यामुळे पटकथा लेखन शिकवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळा हे निव्वळ थोतांड आहे, अशी खरमरीत टीका प्रसिद्ध पटकथा व संवाद लेखक प्रताप गंगावणे यांनी केली. मसूर (जि. सातारा) 18 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात ज्येष्ठ रंगकर्मी सुजित शेख व राजीव मुळ्ये यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत प्रताप गंगावणे यांनी दिलखुलास फटकेबाजी केली व साहित्यिकांना मंत्रमुग्ध केले.
पटकथा लेखन ही अवघड गोष्ट नाही. पटकथा लेखन हे जरूर एक तंत्र आहे. परंतु ज्याला उत्तम कथा लिहिता येते, ज्याला उत्तम थाप मारता येते, तो उत्तम पटकथा लिहू शकतो असे सांगत, प्रताप गंगावणे यांनी त्यासंबंधी घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळांवर टीका केली. लोक गरीब माणसांच्या बाजूने उभे राहतात. पटकथा अशीच आहे. ती हेच सांगते. कथेमध्ये काही ट्विस्ट आला तरच लोक पाहतात. हे ट्विस्ट आणल्याने कथा सुंदर बनत जाते. चित्रपट पाहायला येणारा माणूस पैसे खर्चून आलेला असतो. तो जाताना शिव्या देत नव्हे, तर दहा लोकांना चित्रपटाविषयी सांगत गेला पाहिजे, याची जाणीव पटकथा लिहिताना ठेवली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले.
ऐतिहासिक लिखाण करणे महाराष्ट्रात तरी खूप जोखमीचे काम आहे. मी जसे ऐतिहासिक मालिका लिहू लागलो, तसे त्यातील संदर्भ असलेल्या सर्व ठिकाणी आपण फिरलो. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका तशी क्रिटिकल होती. त्यात संदर्भ आलेल्या असंख्य ठिकाणी माझे मित्र होते. त्यांच्याकडून आपण अचूक संदर्भ घेत गेलो असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज जसे महापराक्रमी होते तसे उत्तम लेखक, कवी होते. परंतु त्यांच्याविषयी आपल्यापुढे सातत्याने चुकीचा इतिहास मांडला गेला. याच मसूर गावात ज्यांना पेशवाईची वस्त्रे शाहू महाराजांनी दिली, ते बाजीराव पेशवे चाळीसाव्या वर्षी गेले. त्यांनी एकही लढाई हरली नाही. असा बाजीराव पेशवा मस्तानीसाठी वेडा होईल? असा जळजळीत सवाल गंगावणे यांनी केला.
ज्यावेळी चित्रपट लिहितो, त्यावेळी व्यावसायिक भान ठेवावे लागते. तथापि, माझ्या शब्दांमध्ये बदल करण्याची संधी मी समोरच्या व्यक्तीला कधीच देत नाही. मी जयश्री गडकर, पद्मा चव्हाण, वर्षा उसगावकर, निळू फुले, अशोक सराफ, गुलशन ग्रोव्हर अशा दिग्गजांसाठी लेखन केले. मराठी भाषेला वेगळा डौल देण्याचा कायम प्रयत्न केला. जे लिहिले त्यासाठी अभ्यास करत राहिलो. तथापि, माझ्या स्वप्नातील खरीखुरी अजरामर कलाकृती अद्याप करू शकलो नाही. येत्या काळात त्याकडे लक्ष देणार आहे. मला ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेण्याची आवश्यकता कधीच वाटली नाही. पुढील काळातही मी निखळ मनोरंजन करत राहीन, असे सांगत गंगावणे यांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशा सांगितली. सुजित शेख व राजीव मुळ्ये यांच्या सुरेल संवादातून ही प्रकट मुलाखत खुलत गेली व रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.