कराडजवळ गांजा वाहतूक करणारा वाळवा तालुक्यातील युवक सापडला

कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर नारायणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकीवरून गांजा घेवून जाणाऱ्या एकास कराड तालुका पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा गांजा व 50 हजार रूपये किमतींची दुचाकी असा एकूण 1 लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कराड तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्षय महादेव नलवडे (वय- 27, रा. साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली असे संशयित युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इस्लामपुर येथून एक गाडी हायवेवरुन कराडच्या दिशेला गांजा घेवून येत असल्याची माहिती कराड पोलिसांना मिळाली होती. दुचाकी होन्डा अॅक्टिवावरून (क्रमांक- एम. एच. 10 डी. एस. 8660) गांजाची वाहतुक होत होती. नारायणवाडी गावचे हद्दीतील प्रणव वाईन शॉपचे समोर सर्व्हिस रोडवर पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी पथकासह रात्रौ 8.15 वाजता कारवाई केली. सदर मोटार सायकल थांबवून त्यांची चौकशी केली असता, त्याने गांजा असल्याचे सांगितले. अक्षय नलवडे यांच्याकडील गांजा आणि मोटर सायकल असा एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे. या कारवाईत 6 किलो गांजा जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स. फाै. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, तानाजी बागल, पो. कॉ. अनिकेत पवार, गणेश बाकले, म. पो. ना. दिपाली पाटील यांनी केलेली आहे.