पोलिस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या वडगाव हवेलीच्या युवकाला अटक

कराड | पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाकडील दागिने लंपास करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. कोयना वसाहत येथील विठ्ठल मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. निलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, मलकापूर शहरातील जगदाळे मळ्यात राहणारे आत्माराम राऊत हे पायी चालत निघालेले असताना दोघेजण त्यांच्याजवळ आले. पोलीस असल्याचे सांगून त्यांनी राऊत यांना गळ्यातील चैन व हातातील अंगठी मागीतली. राऊत यांनीही दागिने त्यांच्याकडे दिले. त्यानंतर चैन व अंगठी कागदाच्या पुडीत बांधून पाकीटात ठेवले आहे, ते खिशात घाला असे सांगून ते दोघेजण दुचाकीवरुन तेथून निघून गेले. मात्र, काही वेळाने शंका आल्यामुळे राऊत यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याची चैन व अंगठी दिसली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आत्माराम राऊत यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी कोयना वसाहत येथे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सतीश जाधव, पोलीस नाईक संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव यांच्यासह कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना आरोपी निलेश चव्हाण हा दुचाकीवरून संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाकडील दागिने लुटल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याकडे असलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. त्याच्या साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.