खातेदारांनो! KYC कागदपत्रे जोडा अन्यथा सातारा जिल्हा बॅंक खाती गोठवणार
सातारा | रिझर्व्ह बँक व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेच्या (DCC Bank) सर्व खातेदारांनी केवायसी करणे बंधनकारक असून, त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता बँकेच्या सभासदांना करावी लागणार आहे. त्यासाठी केवायसीसाठी (KYC) आवश्यक असलेली कागदपत्रांची झेरॉक्स येत्या 31 ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखेत जमा करावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेच्या सभासदाना केवायसी बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी सत्यता पडताळून घेण्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, कामाच्या ठिकाणचे ओळखपत्र, विद्यार्थी ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड आदींपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची झेरॉक्सप्रत बँकच्या जवळच्या शाखत जमा करावी. त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
जे खातेदार केवायसी कागदपत्रांची पूर्तता सादर करणार नाहीत. त्यांची खाती एक सप्टेंबरपासून गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा खात्यावर कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे खातेदारांनी आपली केवायसीची कागदपत्रे मुदतीत बँकेच्या शाखेत जमा करावी, असे आवाहन श्री. पाटील व श्री.सरकाळे यांनी केले आहे.