वाई कोर्टातील गोळीबारानंतर सातारा कारागृहात खुनी हल्ला

सातारा | वाई न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारानंतर जिल्हा कारागृहातही जाधव व नवघणे यांच्या समर्थकांच्यात हाणामारी झाली. बंटी जाधव याच्या समर्थकांनी गोळीबार करणाऱ्या राजेश चंद्रकांत नवघणे व त्याच्या दोन साथीदारांवर जिल्हा कारागृहात हल्ला केला. मनोज वाघमारे, सिद्धेश घाडगे व परमेश्वर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या बंटी जाधवच्या समर्थकांची नावे आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बंटी जाधव, निखिल मोरे व अभिजित शिवाजी मोरे या तिघांनी कळंबा कारागृहातून राजेश चंद्रकांत नवघणे या हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्याकरिता कळंबा कारागृहातून श्री. नवघणे यास फोन करून वारंवार धमक्या दिल्या होत्या, तसेच 1 जून 2023 रोजी मेणवलीतील हॉटेल माघवन इंटरनॅशनल येथे त्याने 12 साथीदारांना पाठवून श्री. नवघणेला पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच दरोडा टाकून दीड तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली होती. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात 15 जणांवर खंडणी व दरोडाचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) निखिल मोरे व अभिजित शिवाजी मोरे (दोघेही रा. गंगापुरी) यांना सोमवारी (ता. 7) दुपारी बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले होते. त्यांना न्यायालयाचे बाहेरील कक्षाचे बाकड्यावर बसवले होते. त्या वेळी नवघणे याने वकिलाचे वेशामध्ये फाइलमध्ये लपवून आणलेल्या पिस्तुलातून तिघांच्या दिशेने गोळीबार केला होता. या वेळी पोलिसांनी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करत नवघणे यास ताब्यात घेतले.
बराकीमधून बाहेर काढले अन् हाणामारी
या गुन्ह्यात राजेश नवघणे व त्याचे दोन साथीदार शरदराव रवींद्र पवार (रा. बावधन नाका, वाई) व विजय लक्ष्मण अंकोशी (रा. काशीकापडी झोपडपट्टी,वाई) हे सहभागी असल्याचे समोर आले. त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी बंटी जाधवचा साथीदार मनोज वाघमारे हा होता, तसेच बंटी जाधवचे अन्य साथीदार नीलेश घाडगे, परमेश्वर जाधव होता. जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांना दररोज सकाळी दहा ते बारा या कालावधीत बराकीमधून बाहेर सोडले जाते, त्यानुसार आज सर्वाना बाहेर सोडण्यात आले होते. दुपारी बंटी जाधवच्या समर्थकांनी विजय अंकोशी याला दगडाने, तर राजेश व रवींद्र यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कारागृह पोलिसाच्या फिर्यादीवरून तिघांवर मारहाणीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जखमीचे जबाब नोंदवले. त्यानुसार तीन संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.