साताऱ्यातील 22 लाखांच्या दरोड्यात मध्यप्रदेशातून आरोपीस बेड्या
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
पुणे- बेंगलोर महामार्गावर बोपेगाव (ता. वाई) गावचे हददीतील हॉटेल कोहीनूर येथे थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून 22 लाख रूपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले असून संशयित आरोपीस मध्यप्रदेश येथून अटक करण्यात यश आले. तसेच संशयित आरोपींकडून तब्बल 18 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, बोपेगाव गावच्या हद्दीत व्ही. आर. एल. ट्रॅव्हल्स ही नाष्टा करणेसाठी थांबली असताना फिर्यादी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे (वय- 42 वर्षे, रा. भैरवनाथनगर, धानुरी रोड, विश्रांतवाडी, पुणे) यांच्याकडील सिटवर ठेवलेली काळे रंगाची बॅगमधील ते काम करीत असलेल्या सुवर्णा बिल्डकॉम कंपनीचे मशीनरी विक्रीतून आलेले 22 लाख रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची फिर्यादी दिल्याने अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तपास करत होते. तपास पथकाने गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील सातारा-पुणे हायवे रोडवरील तसेच आरोपींच्या गुन्हा करुन पळुन जाण्याच्या मार्गावरील जवळपास 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजेस तपासून आरोपी निष्पन्न केले. तपास पथकाने 8 आक्टोबर 2023 रोजी गुन्ह्यातील आरोपी रज्जब हसन खान (वय- 41 वर्षे, रा. सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश यास धरमपुरी, मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले. संशयित आरोपीस भुईंज पोलीसांनी अटक करुन वाई न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निबाळकर, यांनी या कारवाईत सहभाग घेतला.