अमित ठाकरेंनी संजय राऊतांची साताऱ्यात उडवली खिल्ली म्हणाले…
कोरेगाव येथे मनसेची केसरी बैलगाडा शर्यत

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज साताऱ्यातील कोरेगाव येथे आयोजित केलेल्या मनसे केसरी बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैलगाडीमध्ये बसण्याची विनंती केली. मात्र, अमित ठाकरे स्वतः हा बैलगाडी सोबत जोडलेल्या बैलांच्या बरोबर चालत स्टेजपर्यंत आले आणि दोन्ही बैलांना स्वतःचे मस्तक लावून नमन केले. यावेळी बैलाविषयी असणारा त्यांचा आदर पाहायला मिळाला. आज घेतलेल्या मनसे केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अचानक सूत्रसंचालकाने बोलण्यास सुरुवात केली असता, अमित ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया मध्येच थांबवत. या ठिकाणी संजय राऊत आलेत का? असे म्हणत राऊतांची खिल्ली उडवली.
कोरेगाव (जि. सातारा) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बैलगाडी स्पर्धकांनी आणि शौकिनांनी आपली उपस्थिती लावली होती. यादरम्यान सध्या राज्यभरात बैलगाडा शर्यती मध्ये चर्चेत असणारा बकासुर बैलाला पाहण्यासाठी अमित ठाकरे हे आवर्जून स्टेजवरून खाली आले. अमित ठाकरे यांनी बकासूर बैलाच्या मालकासोबत बैलाच्या आरोग्याची विचारपूस केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, या बैलगाडी शर्यतीसाठी आलेल्या अमित ठाकरे यांचे साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टारंट चाैकात सातारी कंदी पेढ्याचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले.
अमित ठाकरे म्हणाले, माझ्या आयुष्यातील पहिली शर्यत आहे. प्राण्यांच्या डोळ्यात आनंद दिसत असतो, आज मला शर्यतीचे बैल पाहून घरातील प्राण्यांची आठवण आली. आज मनसे हा एकमेव पक्ष लोकांच्यासाठी काम करत आहे. आजच्या राजकारणामुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.