उंब्रजजवळ उत्तर मांड नदीवरील पुलावर एसटी बस उलटली
कराड । पुणे- बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाला असून पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आज गुरुवार (दि. 6) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस विजापूर ते सातारा अशी जात होती. या अपघातातून 15 ते 20 प्रवासी बचावले असून ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर शिवडे गावचे हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर विजापूर ते सातारा जाणारी एसटी बस पलटी झाली. या बसमधून सुमारे पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस पलटी झाल्याने प्रवासांना मार लागला. तसेच या अपघातात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले. दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची पंचनामा सुरू आहे.