मसूरला वीज ग्राहक व अधिकाऱ्यांच्यात बाचाबाची : 1 जुलैला रास्ता रोकोचा इशारा

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
वीज ग्राहकांनी सार्वजनिक व वैयक्तिक तक्रारी, अडचणी अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्या. मात्र अधिकाऱ्यांनी पूर्णता डोळे झाकून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात वीज ग्राहक व अधिकारी यांच्यात आज बैठक झाली, यावेळी अनेकांनी तक्रारी मांडल्या. अगोदरच्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या बरोबर बाचाबाची झाली. नेहमीप्रमाणे आजच्या बैठकीतही अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली. मात्र, विश्वासाहर्ता न राहिल्याने तक्रारींचा निपटारा 30 जून पर्यंत न झाल्यास 1 जुलैला मसूर जुन्या बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजयराव जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, श्रीकांत जिरंगे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष सिकंदर शेख, शहराध्यक्ष जमीर मुल्ला, युवराज जगदाळे, विकास पाटोळे, वामनराव शिरतोडे, निगडीचे माजी सरपंच आत्माराम घोलप यांच्यासह वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार, सहाय्यक अभियंता ऋषिकेश नलवडे, कनिष्ठ अभियंता प्रदीप गिझरे व वीज ग्राहक उपस्थित होते.
शेती वाहिनीची रात्रीची वेळ व्यवस्थित नाही. सातत्याने होणारा खंडित वीजपुरवठा, लोहारवस्ती नजीकचा डीपी मसूर गावठाणावर घेणे. पोल सरळ करणे. सडलेले खांब बदलणे. किवळ रोडवरील जमीर मुल्ला यांच्या घराजवळची लाईन गावठाणावरून देणे. झाडे तोडणे आदी सार्वजनिक व वैयक्तिक तक्रारी मांडण्यात आल्या. सरपंच पंकज दीक्षित यांनी आभार मानले.
शेतीच्या कनेक्शनसाठी 35 हजार रूपयांची एजंटाची मागणी
वीज वितरणने शेतीच्या कनेक्शनसाठी एजंट नेमण्यालाचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. एजंटने 35 हजार रुपये दिल्यास कनेक्शन मिळेल असे म्हटल्याचेही स्पष्ट केले. संभाषणाचे रेकॉर्ड देखील माझ्याकडे असल्याचे सांगत कुंपणच शेत खात असल्याचे एकाने स्पष्ट करीत 35 हजार रुपये चक्क अधिकाऱ्यांच्या समोर टेबलावर ठेवले. पैसे दिल्यावरच काम होणार असेल तर पैसे समोर ठेवले आहेत. द्या कनेक्शन. यावर अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली.