B. Com पेपरफुटी प्रकरण : शिवाजी विद्यापीठाने गंभीर दखल घेतल्याने ‘या’ काॅलेजचे 4 कर्मचारी बडतर्फ

कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात 31 मे 2023 रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर पेपर फोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. बीकॉमचा अॅडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फुटी प्रकरण गाजले होते. शिवाजी विद्यापीठाने गंभीर दखल घेत समितीमार्फत चौकशी लावली होती. या पेपर फुटी प्रकरणी कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची सूचना सोमवारी समितीने केली होती. त्या सूचनेनुसार कॉलेज प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी सेवेतून बडतर्फ केले आहे.
शिवाजी विद्यापीठातर्फे बीकॉमची सहाव्या सेमिस्टर अंतर्गत परीक्षा मे 2023 मध्ये घेण्यात आली. ३१ मे रोजी दुपारच्या सत्रात अॅडव्हान्स अकाउंटन्सीचा पेपर होणार होता. परीक्षा सुरू होण्याअगोदरच हा पेपर फुटला. पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार काही वेळातच लक्षात आला. विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ हालचाली करुन संबंधित प्रश्नपत्रिकेऐवजी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षा घेतली. दरम्यान विद्यापीठ परीक्षा विभाग व शहाजी कॉलेज व्यवस्थापनने या साऱ्या प्रकारची गंभीर दखल घेतली. विद्यापीठाने कॉलेज व्यवस्थापनकडून अहवाल मागविला, सीसीटीव्ही फुटेज तपासले. संस्था व कॉलेज व्यवस्थापननेही विद्यापीठ प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले.
दरम्यान, परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल व विद्यापीठाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करुन चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या निर्णय घेतला. सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये अधीक्षक रवी भोसले, क्लार्क सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील व विशाल पाडळकर यांचा समावेश आहे. संस्था व कॉलेज व्यवस्थापनने मंगळवारी या चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली असल्याची माहिती शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी दिली आहे.