बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला : सातारा जिल्ह्यात 9 ठिकाणी लढत

सातारा | जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम रात्री उशिरा सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित व लक्ष लागून राहिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. दि. 27 मार्च ते दि.3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान दि. 28 एप्रिलला होऊन त्यानंतर तीन दिवसांत निकाल जाहीर होतील.
सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींचा समावेश आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी आज प्रसिद्ध झाली. यामध्ये नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला, तसेच निवडणूक झालेल्या सोसायटींचाही समावेश झाला. त्यामुळे नव्याने झालेल्या या मतदार यादीत प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळी मतदार संख्या राहणार आहे. नव्याने समावेश झालेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता 30 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील नऊ बाजार समितींसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
या वेळेस स्थानिक आमदारांसह खासदारांच्या गटानेही समितीच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होणार आहे. कोरेगावात आमदार महेश शिंदे यांचा गट व आमदार शशिकांत शिंदे गट यांच्यात लढत होणार आहे. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट व आमदार रामराजे नाईक निंबाळकर गट यांच्यात लढत असेल. कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, डाॅ. अतुल भोसले यांचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. पाटणला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाटणकर आणि देसाई गटात लढतीचे चिन्ह आहेत. सातारा, कराड, पाटण, फलटणमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक राहणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः- 27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी. 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार. 28 एप्रिल मतदान होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी व निकाल.