सातारा लोकसभा निवडणूक भाजप कमळ चिन्हावर लढवणार : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम

कराड | विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप कमळ चिन्हावर लढवणार असल्याचे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले आहे. त्याच्या या दाव्यामुळे युतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची भूमिका काय असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यावर भाजपाने दावा केल्याने आता युतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीसोबत वाद निर्माण होवू शकतो. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा व कराड दाैऱ्यावर येत आहेत. त्याच्या दाैऱ्याची पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महेश जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघात आज भाजपाची ताकद मोठी असल्याने अजित पवार यांचा गट लोकसभेला भाजपाला मदत करेल. कराड उत्तर मतदार संघात भाजप एकत्रित काम करत आहे. तसेच दक्षिणेत डाॅ. अतुल भोसले यांचा गट आहे. पाटण मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहेत. साताऱ्यात दोन्ही महाराज भाजपकडे आहेत. कोरेगाव मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहे. तर वाई मतदार संघात मदनदादा भोसले भाजपचे आहेत, तसेच आ. मकरंद पाटील हे अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे वाई मतदार संघात भाजपाची ताकद मोठी आहे. या सर्व बाबीचा विचार करून सातारा लोकसभा मतदार संघ भाजप कमळ चिन्हावर लढेल. तशी आम्ही मागणीही करणार आहोत.