जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा अशैक्षणिक कामांवर बहिष्कार : महेंद्र जानुगडे

सातारा | जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेंतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे न्यायालयाचे आदेश असतानाही नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या सर्व्हचे काम शिक्षकांवर लादण्यात येत आहे. या अशैक्षणिक कामांवर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ बहिष्कार टाकत असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे यांनी दिली.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शासनाने शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली फार मोठे अशैक्षणिक काम राज्यातील शिक्षकांना दिले आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये. फक्त निवडणुका व जनगणना यासारखी महत्त्वाची कामे, सुटीच्या दिवशी व अशैक्षणिक कालावधीत देण्याचे आदेश असतानाही प्रशासनाकडून अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे जबरदस्तीने दिली जातात.
शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करू दिलं जाव व कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी आमच्या प्राथमिक शिक्षकांचा वापर होऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण व्हावी, अशी माफक अपेक्षा आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणांतर्गत शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली शिक्षकांकडून कामे करून घेण्याची शासनाची भूमिका आहे. मात्र, या कामावर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा बहिष्कार असल्याचे श्री. जानुगडे यांनी पत्रकात म्हटल आहे.