Satara चालकाचा ताबा सुटल्याने कार घुसली रसवंतीगृहात : महिला ठार
मायणी | मायणी येथे चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव आलेली मोटार गाडी रसवंतीगृहात घुसल्याने रसवंतीगृह चालक महिला अपघातात ठार झाली. निर्मला धोंडिराम लिपारे (वय- 42) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. संबधित अपघातात निर्मला लिपारे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कराडला पाठविण्यात आले होते, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कलेढोण (ता. खटाव) येथील साळुंखे मळ्यातील तुषार साळुंखे (चालक), राजाराम साळुंखे, नंदाताई साळुंखे, सुप्रिया साळुंखे व दोन लहान मुली असे सहाजण मोटारीने (एमएच- 12 एसवाय 8404) मायणीत येत होते. मोटार मायणी अभयारण्याकडून मातोश्री सरुताई मठाकडे येत असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार रस्त्याकडेला असलेल्या रसवंतीगृहात घुसून पलटी झाली. त्याचवेळी रसवंतीगृह चालक निर्मला लिपारे यांना मोटारीची जोरदार धडक बसली.
अपघात होताच मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी थांबून तातडीने मदत केली. निर्मला लिपारे यांना कराडला उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार नाना कारंडे, पोलिस पाटील प्रशांत कोळी घटनास्थळी पोचले. अधिक तपास बीट अंमलदार भूषण माने करीत आहे