दीडशे कोटीचे कर्ज देतो म्हणून फसवणूक : कराडात साताऱ्यातील एकावर गुन्हा

कराड | कारखान्यासाठी दीडशे कोटीचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाल (ता. कराड) येथील खंडोबा प्रसन्न साखर कारखान्याचे तत्कालिन कार्यकारी संचालक स्वप्नील जिजाबा भिंगारदेवे (रा. बनवडी रोड, सैदापूर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दिलीप प्रभुणे (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल येथील खंडोबा प्रसन्न साखर कारखान्याला दुरूस्ती तसेच कराड अर्बन बँकेचे थकीत कर्ज देण्यासाठी दीडशे कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होता. त्यासाठी विविध वित्तीय संस्थांमध्ये त्यांचे प्रयत्न सुरू होते. याचवेळी अशोक जाधव यांनी स्वप्नील भिंगारदेवे यांची साताऱ्यातील प्रभुणे कन्सल्टन्सीचे प्रमुख दिलीप प्रभुणे यांची ओळख करुन दिली. दिलीप प्रभुणे याने भिंगारदेवे यांच्याशी चर्चा करुन ही रक्कम कशा पद्धतीने उभी करता येईल, हे सांगीतले. तसेच प्रभुणे इंटरनॅशनल प्रा. लि. सिंगापूर येथून रक्कम देण्याचे मान्य केले. त्यासाठी काही करार करावे लागतील, असेही स्पष्ट केले. दिलीप प्रभुणे याच्या बोलण्यावर विश्वास बसल्यामुळे भिंगारदेवे यांनी त्याच्याशी विविध करार केले. तसेच या रक्कमेपोटी कामाचा मोबदला म्हणून 25 लाख रुपये एवढी रक्कम प्रभुणे याने मागीतली. भिंगारदेवे यांनी ती रक्कम देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार कागदोपत्री करार झाल्यानंतर भिंगारदेवे यांनी प्रभुणे याला 25 लाख रुपये दिले. त्यानंतर 17 मार्च 2017 रोजी प्रभुणे याच्या कंपनीकडून भिंगारदेवे यांना कर्ज मंजुरीचे पत्र आले.
कर्जाची पहिली रक्कम 17 मार्च 2017 रोजी 70 कोटी, 10 मे 2017 रोजी कर्जाचा दुसरा हप्ता म्हणून 49 कोटी, 10 आॅक्टोबर 2017 रोजी तिसरा हप्ता म्हणून 35 कोटी रुपये दिले जातील, असा उल्लेखही कर्ज मंजुरीच्या पत्रामध्ये होता. मात्र, 17 मार्च 2017 रोजी कर्जाचा पहिला हप्ता न आल्यामुळे भिंगारदेवे यांनी प्रभुणे याच्याकडे विचारणा केली असता. त्याने तांत्रीक कारण सांगून पैसे मिळतील, असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर वेळोवेळी चर्चा करुनही कर्जाची रक्कम देण्यास प्रभुणे याच्याकडून टाळाटाळ होवू लागली. अखेर भिंगारदेवे यांनी त्यांची 25 लाखाची रक्कम परत मागीतली असता प्रभुणे याने तीन ते चार टप्प्यात 16 लाख रुपये परत केले. मात्र, 9 लाख रुपये अद्यापही परत केले नाहीत. त्यामुळे दिलीप प्रभुणे याने फसवणूक केल्याची तक्रार स्वप्नील भिंगारदेवे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.