सह्याद्री कारखाना चालू हंगामात इथेनॉलचे उत्पादन घेणार : आ. बाळासाहेब पाटील
दिवाळीची साखर व कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत लवकरच योग्य निर्णय

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालू हंगामात सुरुवातीपासून इथेनॉलचे उत्पादन घेणार आहे. प्रतिदिन एक लाख लिटर इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या नव्याने उभारलेल्या प्लांटची गेल्या हंगामाच्या अखेरीस चाचणी घेण्यात आलेली आहे. त्यानुसार इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. सभासदांना दिवाळीची साखर व कर्मचाऱ्यांच्या बोनस संबंधात संचालक मंडळ लवकरच योग्य निर्णय घेईल असा विश्वास सभासदांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिला.
कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ चारुशीला पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना दिली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, कारखान्याच्या व्हॉइस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, संचालक मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहुराज जाधव, प्रशांत यादव, तानाजीराव साळुंखे, प्रणव ताटे आधी उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रतिदिन 1250 मॅट्रिक टन गाळप क्षमतेने सुरू झालेला कारखाना आजच्या हंगामात प्रतिदिन 7500 हजार मॅट्रिक टनाने सुरू आहे. प्रतिदिन 11000 मॅट्रिक टन वाढीव गाळप क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले होते. मात्र 23 मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे विस्तारवाढ प्रकल्पाचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे विस्तारवाढ प्रकल्पाच्या उभारणीस विलंब होणार आहे. गाळपच्या दृष्टीने ऊस तोडणी मजूर टोळ्या 390, बैलगाड्या 834, ट्रॅक्टर गाड्या 374, तोडणी मशीन 11 असे नियोजन आहे. ऊस उत्पादकांनी ऊस सह्याद्री कारखान्यास पाठवावा व सहकार्याची भूमिका घ्यावी.
लालासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याच्या बॉयलर प्रदीपनाची संधी मिळाली. संचालक मंडळ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचाराने व समन्वयाने काम करीत आहे. यात एकसंघपणा महत्त्वपूर्ण ठरला आहे. सभासदांचा विश्वस्त सह्याद्री कारखाना आहे. सभासद शेतकऱ्यांनी याच कारखान्याला ऊस घालावा. कारखाना पुरस्कृत अनेक योजना सुरू आहेत. 36, 000 सभासदांचा कारखाना उत्कृष्ट दर्जाची साखर निर्मिती करीत आहे. शहाजी क्षीरसागर, अजितराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्ही बी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश माने यांनी आभार मानले.
पांडुरंगरुपी पी. डी. पाटील यांच्यामुळे धनगरवाडी- हणबरवाडी उपसासिंचन योजना
पांडुरंगरुपी पी. डी. पाटील यांच्यामुळे धनगरवाडी- हणबरवाडी उपसासिंचन योजनेमुळे शेतात पाणी आले. त्यांची दूरदृष्टी व दिशा दाखवण्याचा योग्य विचार कामी आला. यशवंत विचाराने आमदार बाळासाहेब पाटील काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थितांना केले.