कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

स्मार्ट शेतीसाठी कृषी क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक : डॉ. प्रशांतकुमार पाटील

कृष्णा विश्व विद्यापीठात ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

कराड | कृषीक्षेत्रात अलीकडच्या काळात रोबोटिक व ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे. अशा नाविण्यपूर्ण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास स्मार्ट पद्धतीने कृषीक्षेत्राचा विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कृषीविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.

कृष्णा विश्व विद्यापीठ, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पंजाब येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर यांच्या सहकार्यातून कृष्णा विद्यापीठात आयोजित ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते व कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षखाली दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

व्यासपीठावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, आयआयटी रोपरचे चिफ इनोव्हेशन ऑफिसर मुकेश केस्तवाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. डी. शाळीग्राम, कृष्णा विद्यापीठाच्या इनोव्हेशन ॲन्ड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा अलाईड सायन्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतात कृषीक्षेत्रात झालेल्या विकासाचे, तसेच हरित क्रांतीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा प्रदान करताना कमी होत चाललेले जमीनधारणा क्षेत्र व हवामानबदल ही दोन मोठी आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत. हवामानबदलाचा कृषीक्षेत्रावर मोठा परिणाम होत असून, याबाबत व्यापक संशोधन होण्याची गरज आहे.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलपती डॉ. सुरेश भोसले म्हणाले, शेती व आरोग्याचा निकटचा संबंध असून, कृष्णा विश्व विद्यापीठात कृषीविषयक राष्ट्रीय परिषद होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. अलीकडे शेतीवरील उपजिवीकेचे प्रमाण कमी होत चालले आहे. तसेच जमीन धारणा क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात आधुनिक पद्धतीचा अवलंब करत सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज आहे.

भारताच्या जडणघडणीत कृषीक्षेत्राचे योगदान मोठे आहे. लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या कृषीधोरणाची पायाभरणी केली. तर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांनी या भागात शेतीला व कृषी अर्थकारणाला चालना देत शेतीक्षेत्राचा विकास केला. मानवी जीवन अधिक सुकर करण्यासाठी कृषी संशोधनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व्यवस्थापन व आधुनिक सिंचन तंत्र या विषयाच्या अनुषंगाने विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असून, देशातील विविध भागामधून सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले आहेत. डॉ. डी. के. अगरवाल यांनी स्वागत व प्रास्तविक केले. डॉ. जयंत पवार यांनी आभार मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker