मसूरमध्ये आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार, साखळी उपोषण सुरू
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी 1 डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मसूर (ता. कराड) येथे जुन्या बसस्थानक चौकात मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणास आजपासून सुरुवात केली आहे. मसूरसह विविध गावांमधील मराठा समाज बांधव एकवटून साखळी उपोषणास मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. उपोषणस्थळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय अशा घोषणा दिल्या. जुन्या बसस्थानक चौकात उभारलेल्या मंडपात साखळी उपोषणास सुरुवात झाली असून मराठा बांधव उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. एकंदरीत आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार पहावयास मिळत आहे.
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्यासाठी इशारा देण्यात येत आहे. आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत सरकारला देण्यात आली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही मराठा बांधवाकडून व्यक्त केला जात आहे. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या आंदोलनात गावागावात साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले होते. तास पाठिंबा म्हणून मसूर व विभागातील गावांनी या साखळी उपोषणास मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. सर्व मराठा समाजातील बांधवांनी व तरुण मंडळांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी येथील चावडी चौकातील वेशीतील मारुती मंदिरात दोन वेळा मराठा समाज बांधवांनी बैठक घेतली. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी व पाठिंबा दर्शवण्यासाठी साखळी उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आमचा लढा आता सुरू राहणार असल्याचे मराठा बांधवांनी स्पष्ट केले. सामाजिक, राजकीय व सर्व स्तरातील मराठा बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.