कराड येथे तहसील कचेरीवरील चले जाव मोर्चाला उद्या 81 वर्ष पूर्ण
कराड | स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांनी 24 ऑगस्ट 1942 रोजी कराड मामलेदार कचेरी वरती 3 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला होता. त्याचा 81 वा स्मृतीदिन उद्या (दि. 24 रोजी) आयोजित केला असल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी दिली. गुरूवारी सकाळी 10 वाजता कराड तहसील कचेरीत शासकीय कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, दादा उंडाळकरांचे नातू रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, तहसीलदार विजय पवार, स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव जाधव, आनंदराव बाळा जाधव, शासकीय अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्वातंत्र्यवीर दादांनी अत्यंत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा यशस्वी केलेला होता. दादांना इंग्रज सरकारने अटक केली होती. त्या मोर्चाचा 81 वा वर्धापन दिन शासनाच्या वतीने तहसील कार्यालयासमोरील स्तंभास पुष्प चक्र व अभिवादन करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर ट्रस्टच्या वतीने करणेत आले आहे.