Video : ‘भैरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात पाठरवाडीत गुलालाची उधळण

कराड | भैरोबाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत, फटाक्यांची आतिषबाजी व सासनकाठ्या नाचवत सातारा, सांगली, कोल्हापुरसह कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाठरवाडी- तांबवे (ता. कराड) येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात झाली. या यात्रेनिमित्त तांबवे पंचक्रोशीतील यात्रा- जत्रांना प्रारंभ झाला.
पाठरवाडी येथे रात्रभर वाटेगाव, काले, शेरे,सोनाईचीवाडी येथील भाविकांनी लेझीम- दांडपट्याचा कार्यक्रम सादर केला. मंदिर परिसरात रात्रभर लोक मुक्कामी दाखल झालेली होती. श्री. भैरवनाथ अन्नछत्रात आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यात्रेच्या आदल्या दिवशी गुरूवारी रात्री प्रतिवर्षाप्रमाणे तांबवे (ता. कराड) येथील कै. विमल वामनराव पाटील यांच्या स्मरणार्थ वसंतराव वामनराव पाटील यांनी तसेच इंचलकरंजी येथील श्री. भुते कुटुंबियांनी अन्नदान केले. शुक्रवारी पहाटे विधीवत पुजा झाल्यानंतर साडेसहाच्या सुमारास आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.
पालखी मंदिरातुन बाहेर येताच भाविकांनी भैरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर करत गुलाल- खोबऱ्याची उधळण केली. त्याचबरोबर फटाक्यांचीही आतिषबाजीही केली. त्यानंतर यात्रेसाठी पाठरवाडीत दाखल झालेल्या वाटेगाव, तांबवे, सोनाईचीवाडी, काले, शेरे यासह अन्य मानाच्या सासनकाठ्या आाणि पालखीचा भेटीचा सोहळा झाला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. यात्रा संपन्न झाल्यानंतर घरी परतणाऱ्या भाविकांना डोंगराच्या पायथ्याशी मुंबईकर मित्र मंडळाने महाप्रसादाचे वाटप केले.