मसूर येथील जलजीवन पाणी योजनेत अधिकारी व ठेकेदारांच्यात मिलीभगत
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूर (ता. कराड) येथे कोटावर केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाच्या त्रुटी वारंवार निदर्शनास आल्या आहेत. जलजीवन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब बांधणीवेळी अधिकारी, ठेकेदार व संबंधित लोक देखभालीस नव्हते. शिरवडेच्या पाण्याच्या टाकीची तीच अवस्था आहे, असे निदर्शनास आणून देत जलजीवन पाणी योजनेच्या कामाची पद्धत चुकीची असल्याचा आरोप जलजीवन कमिटीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, सुनील जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते कादर फिरजादे, दिनकर बर्गे, हणमंत मोरे यांनी केला आहे. तसेच अधिकारी व ठेकेदार यांच्यात मिलीभगत असल्याची शंकाही उपस्थित केली आहे.
मसूरला कायमस्वरूपी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. या कामास आमचा विरोध नाही. मात्र, ती दर्जेदार पद्धतीने व इस्टिमेटनुसार व्हावीत अशी ग्रामस्थासह पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात जलजीवनची कामे सुरू आहेत. मात्र मसूरचे काम रामभरोसे चालू असल्याचे अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. ग्रामसभेमध्येही या विषयावर चर्चा झाली आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना लेखी तोंडी तक्रारीही सांगितल्या. मात्र सुरू असलेल्या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, ठेकेदार, इंजिनियर कोणीही फिरकत नाही. पूर्ण वर्षभरात काम सुरू झाल्यापासून कमिटीची एकच मीटिंग झाली. तदनंतर कामकाज कसे चालू आहे याचा कसलाही आढावा झाला नाही. 3 जुलै रोजी कार्यकारी अधिकारी वाईकर यांनी कमिटी व ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चालू कामाची पाहणी व कमिटीची मीटिंग घेऊ असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. काम मात्र रामभरोसे रेटून सुरू आहे. त्यामुळे कमिटी फक्त कागदोपत्रीच आहे का असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी केला आहे..
पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी कोटावरची जागा नाकारली होती. परंतु त्याच जागेवर योजनचे काम सुरू आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला. आहे. कामाला दर्जा नाही ,निकृष्ट पद्धतीने काम सुरू आहे अशाही तक्रारी करण्यात आल्या. सोमवारी शाळेवरील टाकीचा पहिला टॉपचा स्लॅब चे काम सुरू होते . कमिटीचे पदाधिकारी पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे कानकून लागतात संबंधित ठेकेदार कामाच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्रुटी दाखवून सूचना करूनही या कामाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे संबंधितांस दर्शवून दिले. भविष्यात कामाचा दर्जा योग्य न राहिल्यास आंदोलन करण्याचा पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला.
जलजीवन मिशनच्या सुरू असलेल्या कामांतर्गत कार्यकारी अधिकारी वाईकर यांनी भेट देऊन कामातील अनेक चुका ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावेळी हजारो कोटीची कामे आम्ही करतो. आम्हाला कामाच्या पद्धती माहिती आहेत, असा उलट जबाब संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदाराने कमिटी व ग्रामस्थांसमोर दिला होता. तेव्हा जलजीवनच्या कामाच्या दर्जाबाबत मनमानी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.