ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यशैक्षणिकसातारा

शिवाजी विद्यापीठाच्या सातारा उपकेंद्रासाठी समिती स्थापन

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या 10 ते 15 वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटना यांची मागणी होती. यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली असल्याने लवकरच सातारा येथे उपकेंद्र होण्यासाठी गती मिळाली असल्याचे सिनेट सदस्य अमित जाधव यांनी म्हटले आहे.

सातारा येथे उपकेंद्र व्हावे यासाठी डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. श्रीमती वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव, सारंग कोल्हापुरे व रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सातारा उपकेंद्रासाठी या समितीमार्फत जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ऐंशीच्या दरम्यान महाविद्यालये असून या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, सेवक वर्ग आणि संस्थाचालक यांना विविध प्रशासकीय कामे, गुणपत्रके, फेरमुल्यांकण, पदवी प्रमाणपत्रे, मायग्रेशन आदी कामांकरिता वारंवार कोल्हापूरला जावे लागते.

सातारा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने जिल्ह्यातील शिरवळ, म्हसवड, फलटण, महाबळेश्वर या शहरांपासून विद्यापीठ हे एकेरी अंतर सुमारे 150 ते 190 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे एवढा दूरवरचा प्रवास करून विद्यापीठात छोट्या कामासाठीही जावे लागते. यात पूर्ण दिवस प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये मोठ्या विद्यापीठांची उपकेंद्रे – उपपरिसर स्थापन करण्याची तरतूद केली आहे. सातारा येथे उपकेंद्र झाल्यास विविध प्रकारचे अभ्यासक्रमही याठिकाणी सुरु होणार आहेत तसेच संशोधनात्मक प्रकल्पही सुरु होण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात सातारा उपकेंद्र झाल्यास त्याचे रूपांतर विद्यापीठातही होऊ शकते. सदर समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे सदस्यांनी सांगितले आहे.

समितीचा अहवाल लवकरच विद्यापीठ प्रशासनाकडे पाठवला जाणार ः अमित जाधव
आम्ही सन 2016 मध्ये विद्यार्थी काँग्रेस ( N.S.U.I) च्या वतीने जिल्हाधिकारी व कुलगुरुंकडे सातारा येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी निवेदन देऊन आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. आज मला सिनेट मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही सर्वांनी पहिल्याच सिनेट बैठकीत सातारा उपकेंद्र व्हावे यासाठी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता सातारा उपकेंद्र करण्याकरिता समिती नेमल्यामुळे गती मिळाली असून लवकरच बैठक होऊन सविस्तर अहवाल प्रशासनाकडे पाठवला जाईल असे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker