नाट्यमय घडामोडी वाचा : कराड बाजार समितीत काॅंग्रेसची बाजी, भाजप- राष्ट्रवादीचा पराभव
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत क्राॅस वोटींगमुळे अत्यंत नाट्यमय अशी ही निवडणूक ठरली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वातील काॅंग्रेसच्या स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलने 12 जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. तर माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या भाजप- राष्ट्रवादीने 6 जागांवर विजय मिळवला असून त्यांना पराभवाचा धक्का बसला.
कराड बाजार समितीत सकाळी 11 पहिला निकाल हाती आला, यामध्ये व्यापारी गटातून अपेक्षेप्रमाणे उंडाळकर गटाने विजय मिळवला. तर सोसायटी गटात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये भाजप- राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलने 70 ते 80 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आ. बाळासाहेब पाटील व डाॅ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच्या सर्व 11 जागा जिंकणारच अशा आत्मविश्वासाने ठिकठिकाणी फटाके वाजवून जल्लोष केल्याने काॅंग्रेस काका- बाबा गटात शांतता पसरली होती. अशावेळी अंतिम महिला राखीव गटाचा निकाल हाती आला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्राॅस वोटींग झाले अन् तेथे एक जागा सत्ताधारी गटाला तर एक विरोधी गटाला मिळाली. या निकालाने जल्लोष करणारे कार्यकर्ते व नेत्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अखेर सोसायटी गटात भाजप- राष्ट्रवादीने 6 जागांवर बाजी मारली, मात्र उंडाळकर- चव्हाण यांनीही 5 जागा मिळविल्याने दोन्ही गटात धाकधूक सुरू होती. कारण अंतिम निकाल ग्रामपंचायत मतदार संघाचा लागणार होता. तेव्हा दोन्ही गटाकडून आपणच विजयी होणार असल्याचे बोलले जात असताना टेन्शमध्येही असल्याचे दिसत होते. अशातच 2 वाजून 45 मिनिटांनी आलेल्या निकालात 4 ग्रामपंचायतीच्या जागेवर काॅंग्रेसने बाजी मारली अन् कराड बाजार समितीची सत्ता राखण्यात यश मिळवले. तर भाजप- राष्ट्रवादी या युतीला सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंगले.
आ. बाळासाहेब पाटील व डाॅ. अतुल भोसले गटाचे विजय उमेदवार व त्यांची मते पुढीलप्रमाणे :- सर्वसाधारण गटातून :- विनोद रमेश जाधव (907), जगदीश दिनकरराव जगताप (900), दयानंद भीमराव पाटील(900), उद्धवराव बाबुराव फाळके (898), मानसिंगराव वसंत जगदाळे (891), महिला प्रवर्गातून ः- इंदिरा बाबासो जाधव- पाटील (914),
रयत पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – दीपक (प्रकाश) आकाराम पाटील (898), विजयकुमार सुभाष कदम (886), महिला प्रवर्गातून ः- रेखाताई दिलीप पवार (926), इतर मागास प्रवर्गातून ः- सर्जेराव रामचंद्र गुरव (922), वि. जा. भ. ज. प्रतिनिधी ः- संभाजी श्रीरंग काकडे (924), ग्रामपंचायत मतदार संघ ः- सर्वसाधारण गट ः- राजेंद्र रमेश चव्हाण (937), संभाजी लक्ष्मण चव्हाण (928). अनुसुचित जाती- जमाती प्रतिनिधी ः- नितीन भिमराव ढापरे (943). आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी ः- शंकर दिनकर इंगवले (972). व्यापारी व आडते मतदार संघ प्रतिनिधी ः- जयंतीलाल चतुरदास पटेल (259), जगन्नाथ बळी लावंड (255). हमाल मापाडी मतदार संघ ः- गणपत आबासो पाटील (बिनविरोध).
अवघ्या 1 मताने विजयी
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत एका- एका मताला काय किंमत व महत्व असते, यांचा प्रत्यय आला. सोसायटी गटाच्या इतर मागास प्रवर्गातून अवघ्या 1 मताने विजय मिळवला आहे. या गटात उंडाळकर गटाचे सर्जेराव रामचंद्र गुरव यांना 222 तर फिरोज अल्लीभाई इनामदार यांना 921 मते मिळाली.