शिपाई ते पोलीस निरीक्षक : बामणवाडीच्या तानाजी पवार यांची बैलगाडीतून जंगी मिरवणूक

कुसूर | एका खेड्यातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा नोकरीसाठी मुंबईला जातो. तेथे हमाली करत पोलीस भरती होतो. शिपाई ते पोलीस निरीक्षक पदापर्यंत टप्पा पार करतो हे सोपे काम नाही. त्यांनी निष्ठा आणि प्रमाणिकतेच्या जोरावर मिळविलेले यश आहे. सेवानिवृत्ती हा पहिला टप्पा आहे. पुढील कार्य समाज कार्यासाठी सार्थकी लावावे, असे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.
कराड तालुक्यातील बामणवाडी गावचे सुपुत्र पोलीस निरीक्षक तानाजी पांडुरंग पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पारंपारिक पद्धतीने बैलांना सजवून बैलगाडीतून वाजत गाजत पवार यांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादीतचे सारंग पाटील, ऐरोली शिवसेना प्रमुख चंद्रकांत चाळके, सह्याद्री बँकेचे उपाध्यक्ष सुरेश पवार, माजी उपसभापती रमेश मोरे, योगेश पाटणकर, श्रीरंग चाळके, रमेश मोरे, श्रीरंग चाळके यांच्यासह कुंभारगाव, बामणवाडी, वानरवाडी, पवारवाडी, कारंडेवाडी, शिबेवाडी, बामणवाडी, कुसूर, तारूख, कोळेवाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी तानाजी पवार यांचे मोठे बंधू पोलीस हवालदार शरद पवार यांचाही सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला तसेच नेवी दलातून सेवानिवृत्त झालेले शिवाजी काटेकर यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तानाजी पवार यांनी त्याच्या जिवन प्रवासाचा पैलू उलगडला. युवकांनी अपयशाला खचून न जाता यशाची वाट प्रयत्नानी चोखाळल्यास यश नक्की मिळेल प्रयत्न करा असा सल्ला दिला. कार्यक्रमास परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मित्र परिवार मोठ्या संखेने उपस्थित होते. सुत्रसंचालन हणमंत देसाई यांनी केले. सुधीर यादव यांनी आभार मानले.