शिकारीसाठी लावलेल्या स्फोटात गायीचा मृत्यू : पाटण तालुक्यातील घटना
चाफळ प्रतिनिधी | श्रीकांत जाधव
रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला स्फोटक पदार्थ चरावयास सोडलेल्या गाभण खिल्लार गायीच्या तोंडातील जबड्यामध्ये चाऱ्याचा घास चावताना स्फोट होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. माजगाव (ता. पाटण) येथील वन विभाग हद्दीलगत असणाऱ्या परीटकी शिवारात मालकासमोर हा प्रकार घडला.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव येथील शेतकरी सुरेश गुलाब कदम हे नेहमीप्रमाणे आपली पाळीव जनावरे चरावयास वनविभागालगत असणाऱ्या परीटकी नावाच्या शिवारातील पडीक जमिनीवर गेले होते. अचानक स्फोट झाल्याचा आवाज ऐकू येऊन त्यांच्या समोरच त्यांच्या गायीचे तोंड छिन्नविच्छिन्न झाल्याचे त्यांनी पाहिले. सदरची घटना कदम यांनी आपल्या गावातील लोकांना फोन करून सांगितली. तसेच पोलीस व वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सुचिता माळी, चाफळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल घाडगे यांनी जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. गाईने कोणता तरी स्फोटक पदार्थ खाल्ल्याने गायीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पी. सी. साळवी यांनी येऊन परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला असून पुढील अधिक तपास करत आहेत.