बनाव उघड : प्रियसीचे अफेअर असल्याच्या संशयावरून खून
दिल्लीतील प्रेमाचा कराडात शेवट
कराड – ः मलकापूर (ता. कराड) येथील सनसिटी बिल्डींग येथून युवतीला धक्का मारून खाली ढकलून देऊन ठार मारल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी दिप्ती सिंग (वय- 48, रा. झुरण छपरा रोड नंबर 3, मुजफ्फरनगर एम आय टी मुजफ्फरनगर बिहार) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रियसीचे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून प्रियकराने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. आरूषी सिंग (वय- 21, रा. झुरण छपरा रोड नंबर 3, मुजफ्फरनगर एम आय टी मुजफ्फरनगर बिहार) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर ध्रुव राजेशकुमार छिक्कारा (वय- 21, रा. हाऊस नंबर 684, गल्ली नंबर एक, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत, हरियाणा) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयित आरोपी युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरूषी सिंग ही मलकापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ध्रुव याने आरूषी हिस मलकापूर येथील सनसिटी बिल्डींगमधील त्याच्या रूमवर बोलावून तुझे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून त्रास देत होता. त्याचवेळी ध्रुव याने आरूषी ही एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिला सनसिटी बिल्डींगवरून धक्का मारून खाली ढकलून देऊन ठार मारले. यामध्ये संशयित आरोपी ध्रुव हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ध्रुव हा मेडीकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असे म्हणत प्रियकर ध्रुव आणि आरुषीची यांच्या जोरात वादावादी झाली. त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्यामजल्यावरुन ढकलून दिले. यात तीचा या घटनेत मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशीरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 (1) प्रमाणे ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ध्रुव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. वादातुन ढकलुन दिल्याने युवतीचा मृत्यू झाला असुन संबंधित युवक आरोपींवर गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील करीत आहेत.