कोयना नदीकाठी ‘या’ दोन ठिकाणी मगर आढळली

पाटण । पाटण तालुक्यातील निसरे- नवारस्ता येथे कोयना नदीपात्रात मगर आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिक्षेत्रात मगर असून तेथे नागरिकांनी जावू नये, असे फलकही लावले आहेत. त्यामुळे नदीला जाण्यास नागरिक घाबरत आहेत.
याबाबतची माहिती अशी, निसरे ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची टाकी कोयना नदीकाठावर कोळीवाडा शिवारात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी शरद कोळी हे संबंधित टाकीमध्ये टीसीएल पावडर टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना टाकीशेजारीच मगर दिसली. त्यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली.
दरम्यान, निसरेपासून काही अंतरावर असलेल्या मंद्रुळ हवेली गावातही मगर आढळून आली होती. त्यावेळी ग्रामपंचायत तसेच वन विभागाने नदीकाठावर सुरक्षिततेच्या दृष्टीने फलक लावले होते. ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता निसरेतील पाणवठ्यावर मगर आढळून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.