आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी : लोकसभा मतदार संघ काॅंग्रेसलाच पाहिजे
कोल्हापूर | गेली 20-25 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात काॅंग्रेसच्या मदतीने झालेले दोन्ही खासदार पक्षासोबत गेले. लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा हात गायब झाला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका आयोजित केल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे. रविवारी काँग्रेस समितीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, निरीक्षक अभय छाजेड, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर आदी उपस्थित होते. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील माहिती दिली.
आ. चव्हाण म्हणाले, आपल्या मतदारसंघातील मते, विरोधकांना मिळालेली मते, त्यातील पक्षाची, विचाराची मते किती आणि राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती यावर कार्यकर्त्यांनी मते व्यक्त करावीत, असे सांगितले. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड विधानसभा मतदारसंघाबाबत पदाधिकाऱ्यांनी मते मांडली.