दूधाला 34 रूपये मागत आंदोलकांकडून रस्त्यावर दूध : उंब्रजला घोषणाबाजी
कराड | दुधाचे दर घसरले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून मंगळवारी उंब्रज (ता. कराड) येथील बाजारपेठेतील रस्त्यावर दुध ओतून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुधाला दर मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलकांनी बाजारपेठेत ठिय्या मांडला व दुधाने भरलेली कॅन रस्त्यावर ओतून देण्यात आली.
किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रभर दुध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी दुध उत्पादक संघटनेच्या वतीने मंगळवारी उंब्रज येथे निदर्शने करण्यात आली. कॅप्टन इंद्रजीत जाधव,सुरेश पाटील पेरलेकर,अमित पाटील, शैलेश यादव, कृष्णत जाधव, पोपट कोळेकर यांच्यासह शेकडो दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बाजार पेठेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कॅप्टन इंद्रजीत जाधव म्हणाले, सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आला. दुध दरावर सरकारची भूमिका ठाम नाही. दुधाला 34 रुपये दर शासनाने यापुर्वी मान्य केला आहे. मात्र, सध्यस्थितीत डेअरी मालक 28 रुपये दर देत आहे. वास्तविक 38 रुपये दर दुधाला देणे आवश्यक आहे. मात्र, सरकारच्या 34 रुपयांतही घोटाळा होत असून दुध उत्पादकांना प्रत्यक्षात 28 रुपयेच मिळतात. यावर शासणाचा अंकुश नाही. त्यामुळे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रभर दुध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा राज्यभरातील शेतकऱ्यांचा पाठींबा असून शेतकरी दुध उत्पादक संघानेही या आंदोलनात उडी घेतली असून दुध दराबाबत योग्य निर्णय न झाल्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून यास सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला.