धनगर आरक्षणाचा डिसेंबर महिन्यात निर्णय होणार : आ. गोपीचंद पडळकर
कराड येथील धनगर समाजाचे गेल्या 14 दिवसाचे आंदोलन स्थगित
कराड | महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसापासून जयप्रकाश हुलवान हे उपोषणाला बसले होते. दहिवडी येथील काही आंदोलकांची आज सातारा येथे सकारत्मक बैठक झाली. सरकार धनगर आरक्षणासाठी सकारत्मक पाऊले उचलत असून 3 वेगवेगळी अफेडेव्हीट दाखल केली आहेत. आज झालेल्या तारखेला 8, 11 आणि 15 डिसेंबर रोजी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अंतिम तीन तारखा दिल्या आहेत. त्यानंतर 15 दिवसात आरक्षणाचा सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास भाजपचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
कराड येथे 26 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देत आ. पडळकर व कराड प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यावेळी आ. पडळकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, भाऊसाहेब ढेबे- पाटील, रमेश लवटे, संभाजी काकडे, गणेश लुबाळ, महेश कचरे, गोरख हुलवान, टी. आर. गारळे आदी उपस्थित होते. यावेळी आ. पडळकर म्हणाले, देशातील इतर राज्यात राज्य सरकारने बिहार, तेलंगणा, मध्यप्रदेश सरकारने जीआर काढले आहेत, ते महाराष्ट्र राज्य सरकारकडे दिले आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील प्रतिनिधी त्या-त्या राज्यात शिष्टमंडळ पाठविण्यात येणार असून उद्या शिष्टमंडळात कोण असणार याबाबत चर्चा होणार आहे. सरकार धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे.
चिंता करू नका गोपीचंद पडळकर काफी है !
कराड येथे धनगर समाजाचे जयप्रकाश हुलवान गेल्या 14 दिवसापासून आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत, परंतु याठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे कोणताही सरकारचा लोकप्रतिनिधी फिरकला नाही. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले, चिंता करू नका मी काफी आहे. काळजी करू नका.