शिक्के हटवा अन्यथा 14 जुलैपासून साताऱ्यात धरणे : ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध
सातारा | निगडी, वर्णे, देवकरवाडी व राजेवाडी (ता. सातारा) येथील शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर औद्योगिक विकास महामंडळाने कोणतीही पूर्व सूचना न देता अनधिकृतपणे एमआयडीसीचे शिक्के मारले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून, याबाबत हरकत घेऊन दहा वर्षे झाली, तरी अद्याप हे शिक्के हटवलेले नाहीत. जमिनीवरील शिक्के तातडीने हटवावेत, अन्यथा येत्या 14 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र सेवाभावी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सातारा तालुक्यातील निगडी तर्फे सातारा, वर्णे, देवकरवाडी, राजेवाडीतील ग्रामस्थांनी भूमिपुत्र सेवाभावी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात चार गावच्या ग्रामस्थांनी म्हटले, की औद्योगिक विकास महामंडळाने या चार गावांतील शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीसाठी जमीन संपादनाची नोंद केली आहे.
सदरची नोंद करताना ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. 2013 पासून आजपर्यंत दहा वर्षे झाली, तरी ग्रामस्थांचा विरोध असूनही जिल्हा प्रशासनाने या नोंदी हटविण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. या चारही गावांचा या प्रकल्पास विरोध आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ववत करून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी येत्या 14 जुलैला धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.