कराड तालुक्यातील मराठा समाजाचा एल्गार : आता 200 दिवसाचे चक्री उपोषण

कराड | राज्यात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रान पेटलंल दिसत आहे. जालना जिल्ह्यातील सराटी येथील लाठीमार नंतर ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको सुरू झाला आहे. अशावेळी आता चक्क 13 सप्टेंबरपासून 200 दिवस म्हणजेच सहा महिने चक्री उपोषणाचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या क्रांतीकारी निर्णयामुळे तालुक्यातील प्रत्येक गाव व गावातील प्रत्येकजण या उपोषणात सहभागी होणार आहे.
कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाचे आरक्षण आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला 150 हून अधिक गावातील लोक उपस्थित होते. जवळपास 4 तास विचार विनिमय करून आयोजित पत्रकार परिषदेत चक्री उपोषणांची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक मागण्यांचा समावेश असून प्रमुख मागणी ही 50 टक्क्यांच्या आतील मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच असणार आहे. चक्री उपोषण हे दत्त चाैक येथील शिवतीर्थ येथे होणार असल्याची माहिती मराठा सकल समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आर. पी. आय आठवले गट आणि हिंदू एकता आंदोलन या संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठींबा जाहीर केला.
चक्री उपोषणातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. या आदेशाला जबाबदार मंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा. कुणबी समाजाला असलेले 2 टक्के आरक्षण ऐवजी 14 टक्के आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला द्यावे, आरक्षण देताना ते 50 टक्केच्या आतील असावे. आजपर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत.