कराडमधील रस्त्याचे बिल मंजूरीसाठी लाच घेताना अभियंता सापडला, दोघे ताब्यात
कराड । कराड वाखाण परिसरातील रस्त्याचे कामाचे बिल मंजूर होण्यासाठी नगर अभियंता यांनी 42 हजार लाचेची मागणी केली होती. त्यापैकी तंडजोडीअंती 30 हजार रूपये स्विकारताना खासगी इसम व नगर अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती सातारा पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य यांनी दिली आहे. मलकापूर नगरपरिषद येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी शशिकांत सुधाकर पवार (वय- 37, पद – नगर अभियंता गट क वर्ग 3, मूळ राहणार – मंद्रूळ कोळे, ता. पाटण, सध्या राहणार- वसंत विला पाच मंदिर जवळ- कोयना वसाहत, कराड) व सुदीप दीपक इटांबे (वय- 29 वर्ष, खाजगी इसम, रा. माऊली कॉलनी, मलकापूर- कराड) अशी लाच स्विकारणाऱ्या व्यक्तीची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार हे दुय्यम ठेकेदार असून त्यांची फर्म असून तक्रारदार हे मूळ ठेकेदारांच्या फर्म अंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदार यांनी वाखण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण 21 लाख 75 हजार रुपये बिल झाले होते, त्यापैकी 15 लाख रुपये तक्रारदार यांना मिळाले असून उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 42 हजार रुपये लाचेची आरोपी लोकसेवक शशिकांत पवार यांनी मागणी करून तडजोडीअंती 30 हजार रुपये रक्कम खाजगी व्यक्तीकडून सुदीप दीपक एटांबे (वय- 29 वर्षे, रा. माऊली कॉलनी मलकापूर, ता. कराड) याचे कडे देण्यास सांगून खाजगी व्यक्तीच्या मध्यस्थीने लाचेच्या रकमेचा स्वीकार केला आहे.
आरोपी लोकसेवक शशिकांत पवार नगर अभियंता मलकापूर नगरपरिषद व खाजगी इसम सुदीप एटांबे यांना 30,000 रु लाचेच्या रकमेचा स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पुणे लाप्रवि अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य, पो. ना. प्रशांत नलावडे, पो. ना. निलेश चव्हाण, पो. शि. तुषार भोसले, चा. पो. ना मारुती अडागळे यांनी कारवाई केली.