साडेसहा लाखांना गंडा : आॅनलाईन कामाच्या नावाखाली युवकाची फसवणूक

कराड | आॅनलाईन काम देण्याच्या बहाण्याने युवकाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत अज्ञातावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार मच्छिंद्र शिंदे (रा. मार्केट यार्ड, शनिवार पेठ, कराड) या युवकाने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगीतले की, शहरातील मार्केट यार्डमध्ये राहणारा तुषार शिंदे या युवकाला त्याच्या सोशल मीडियावर मेसेज आला. त्यामध्ये आॅनलाईन काम देणार असल्याचे सांगण्यात आले होते. तुषार शिंदे याने त्या मेसेजला उत्तर देत आॅनलाईन काम करण्यास सहमती दर्शवली. सुरूवातीला संबंधितांनी त्याला त्याचा मोबदलाही दिला. मात्र, त्यानंतर त्यांनी कामाच्या माध्यमातून काही रक्कम त्याला भरण्यास सांगितली. त्यानुसार तुषारने सुरूवातीला काही रक्कम पाठविली.
मात्र, आणखी काम पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार वेळोवेळी तुषार शिंदे याने समोरच्या व्यक्तींनी केलेल्या मेसेजनुसार वेगवेगळ्या बँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने तब्बल साडेसहा लाख रुपये भरले. मात्र, पैशांची मागणी वाढतच असल्यामुळे तुषारला संशय आला. त्याने त्याचे पैसे परत मागीतले असता समोरुन टाळाटाळ करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तुषार शिंदे याने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.