उद्या होणार बाप- लेकीची भेट : अमेरिकेत अपघातग्रस्त नीलमची मृत्यूशी झुंज सुरूच
अखेर वडिलांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला!

अमोल पवार : उंब्रज
कराड तालुक्यातील वडगाव उंब्रजच्या ३५ वर्षीय नीलम तानाजी शिंदे हिचे आयुष्य स्वप्नांसाठी लढण्यात गेले. बालपणापासून ज्या डोळ्यांत मोठी स्वप्ने साठवली, ज्या मेंदूच्या जोरावर तिने अमेरिकेतील शिक्षणासाठी उंच भरारी घेतली, तीच नीलम आज मृत्यूशी झुंज देत आहे. पण दुर्दैव असे की, तिला शेवटचा आधार देण्यासाठी तिच्या वडिलांना अमेरिकेचा व्हिसा मिळत नव्हता!
14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जॉगिंगला गेलेल्या नीलमला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिचे दोन्ही पाय निकामी झाले, मेंदूवर गंभीर मार लागला आणि ती कोमामध्ये गेली. अमेरिकेतील रुग्णालय प्रशासनाने तातडीने कुटुंबीयांना बोलावले, पण नियतीची विचित्र थट्टा—तिच्या वडिलांना व्हिसा मिळत नव्हता!
वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईतील अमेरिकन दूतावासाच्या पायऱ्या झिजवल्या, केंद्रीय मंत्री, माजी खासदार, आमदार अशा सगळ्यांकडे मदतीचा याचना केली, पण उत्तर तेच— मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत होते.” पैशाने सर्वकाही विकत घेता येते, पण मुलीच्या अडचणीच्या काळात जाण्यासाठी मिळणारा व्हिसा मात्र मिळत नव्हता!
दरम्यान, ही हृदयद्रावक माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर कुटुंबीयांना अमेरिकन वाणिज्य दूतावासात भेटीची वेळ मिळाली. तब्बल १४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वडिलांना अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाला!
तानाजी शिंदे यांनी सांगितले की, “जेव्हा आम्हाला विमानाचे तिकीट मिळेल, तेव्हा आम्ही तातडीने अमेरिकेला रवाना होऊ. नीलम सध्या आयसीयूमध्ये असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.”