पुण्याचे फॉरेन्सिक पथक कराडमध्ये दाखल : स्फोटाबाबत पोलिसांकडून महत्त्वाची माहिती…
कराड | शहरातील मुजावर कॉलनी येथे आज सकाळी झालेला स्फोटबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात असताना. या ठिकाणचा स्फोट हा गॅस लिकेज झाल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र, अद्याप पूर्ण खात्री नसल्याने पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमध्ये नऊ जण जखमी झाले असून तिघांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. तर ज्या घरामध्ये स्फोट झाला त्या घरातील चौघांवर अद्याप कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी आहेत.
सकाळी झालेल्या स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने अनेकांकडून वेगवेगळे तर्क लढवले जात होते. यामध्ये बॉम्बस्फोटाची ही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, बॉम्बस्फोट नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या स्फोटाची पूर्ण माहिती समोर येण्यासाठी कराड पोलीस, सातारा पोलीस, बॉम्बशोधक पथक सकाळपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. आता पुण्याच्या फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले असून रात्री उशिरा या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उप अधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव यांच्यासह पोलिस दाखल होते.
स्फोटातील जखमींची आणि घरांचे नुकसान झालेल्याची नांवे पुढीलप्रमाणे
स्फोटामध्ये शरीफ मुबारक मुल्ला (वय- 35), राहत शरीफ मुल्ला (वय- 7), जोया शरीफ मुल्ला (वय- 10), सुलताना शरीफ मुल्ला (वय- 32) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील घरातील अशोक पवार, त्यांची पत्नी सुनिता पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य तिघे या घटनेत जखमी झाले आहेत. पवार कुटुंबियांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शरीफ मुल्ला, अशोक पवार यांच्यासह साईनाथ डवरी, रफीक बागवान यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अस्लम पठाण व आनंदा वारे यांच्याही घरांना या घटनेत फटका बसला आहे.