ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

खटाव बाजार समितीत माजी आ. प्रभाकर घार्गेचे पुन्हा वर्चस्व

वडूज | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकल्या. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभीमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलला 5 जागा मिळाल्या. बाजार समितीवर घार्गे यांनी आपले वर्चस्व या निवडणूकीत पुन्हा सिध्द केले. बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री, तसेच आजी, माजी आमदार व स्थानिक मान्यवरांच्या सहभागामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

माजी आमदार घार्गे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश शिंदे, आ.जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, धैर्यशिल कदम, राहूल पाटील यांच्यासह अनेक समर्थक कार्यकर्ते खटाव तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणूकीसाठी झटत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभीमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेलसाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, स्वाभीमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते या निवडणूकीसाठी लढत होते. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी व मोठी चुरशीची बनली होती. वडूज येथील तहसिलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे, सहाय्यक बाळासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया झाली.

खटाव तालुका विकास आघाडीचे मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्राथमिक कृषी पतपुरवठा व बहुउद्देशिय संस्था- सर्वसाधारण मतदार संघ : महेश घार्गे (६३६ मते), अभिजीत देशमुख (६२६ मते), ज्ञानेश्वर नलवडे (६१७ मते), दत्तात्रय पवार (६१६ मते), राहूल फडतरे (६४७ मते), सुनिल फडतरे (६१२ मते), विजयकुमार शिंदे (६०२ मते). महिला राखीव : सौ. लता जगदाळे (६४७ मते), सुनिता मगर (६२५ मते). इतर मागासवर्गीय राखीव : दिपक विधाते (६५६ मते). विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग राखीव : शरद पाटील (६३६ मते), ग्रामपंचायत सर्वसाधारण : आण्णा वलेकर (५३६ मते). ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : विनोद घार्गे (५४५ मते). शेतकरी सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ : अभिजीत जाधव (५३९ मते). ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघ : शैलेंद्र वाघमारे (५४४ मते). अनुज्ञप्तीघटक व्यापारी व आडते मतदार संघ : संकेत म्हामणे (४२६ मते), गिरीष शहा (४२४ मते). हमाल मापाडी मतदार संघ : स्वप्नील घाडगे (३९५ मते) या निवडणूकीत २०६ मते अवैद्य ठरली. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker