आमदार महेश शिंदे शोलेतील गब्बर सिंग : आ. शशिकांत शिंदे
कोरेगाव | माझी अवस्था शोलेतील असरानीसारखी असली, तरी आपण शोलेतील गब्बर सिंग जसा गावाला वेठीस धरून लुटत होता, तशाच पद्धतीने तुम्ही आज कोरेगाव मतदारसंघाला लुटत आहात आणि आव मात्र साधू-संताचा आणत आहात. ‘खोटं बोल; पण रेटून बोल’, ही तुमच्या खोके व मिंधे सरकारची रणनीती तुम्ही इथे वापरत आहात. लोकांचं पाणी बंद करण्याचे पाप तुम्ही करता, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केली आहे.
आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, की महेश शिंदे आपण फक्त अडीच वर्षांच्या राजकारणाचा उल्लेख केला. या काळात आपण कुठली जलसंधारणाची, कुठली इरिगेशनची कामे केली? आपण ज्या- ज्या लोकांना आश्वासने दिली, त्या भाडळे खोऱ्यामध्ये, पुसेगावच्या वरच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, जायगाव या भागामध्ये आपण नक्की काय करून दाखवलं, यांचा खुलासा एकदा जनतेसमोर होणे गरजेचे आहे.
तुमचं काय चाललंय ? १५-२० टक्क्यांनी तुम्ही कामं घेताय, सामान्य, स्थानिक कंत्राटदाराला बाजूला ठेवून स्वतःचे कंत्राटदार पोसताय. अगदी कोरेगाव नगरपंचायत मेडिकल कॉलेज सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्यावर आरोप होतच आहेत. कशा पद्धतीने दमबाजीने पैसे वसूल करताय, याची चर्चा खमंगपणाने कोरेगाव मतदार संघात सुरू आहे.