सुपनेत मध्यरात्री अज्ञाताकडून गुऱ्हाळावरील गंजीना आग : अग्निशामक गाड्या दाखल
कराड | सुपने (ता. कराड) येथे मध्यरात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने गुऱ्हाळ घरावरील गंजीला आग लावली असून पहाटे 7 वाजले तरी आग विझविण्याचे काम सुरू आहे. कराड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी आग विझविण्यासाठी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत गुऱ्हाळ मालक लालासो अनंत पाटील 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरपणाच्या गंजी पेटल्याने परिसरात आगीचे व धूराचे लोट पहायला मिळत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुपने- किरपे या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गावर पाळक नावाच्या शिवारात लालासो पाटील यांचे गुऱ्हाळ आहे. मध्यरात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास आणे (ता.कराड) गावातील ऊस ट्रक्टर चालकाला गुऱ्हाळासाठी सरपणासाठी आणलेल्या गंजीला आग लागल्याचे दिसले. ट्रक्टर चालकाने गुऱ्हाळ मालक लालासो पाटील यांच्या कुटुंबियांना आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाटील कुटुंबियांनी गुऱ्हाळाकडे धाव घेतली, मात्र यावेळी आगीने राैद्ररूप धारण केले होते.
कराड नगरपरिषदेची अग्निशामक गाडी आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून एका जीसीबीने गुऱ्हाळावरील इतर मालमत्ता, सरपण, गंजी आगीपासून दुसरीकडे हलविण्यात येत आहेत. मध्यरात्री 1.30 वाजता लागलेली आग पहाटे ७ वाजेपर्यंत विझवण्याचे काम सुरू होते. जवळपास 5 तास गंजी लागलेली आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लालासो पाटील यांच्या गंजीना आग लागल्याचा प्रकार तिसऱ्यांदा घडल्याने ही आग नैसर्गिक नसून अज्ञातांनी लावल्याचे बोलले जात आहे.