सातारा, सांगली व कोल्हापूरातून तब्बल 3 लाखाच्या गियरच्या सायकली जप्त
सातारा | बोरगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत चोरीस गेलेल्या गियरच्या व इतर प्रकारच्या सायकलींचा छडा लावत तब्बल 2 लाख 92 हजारांचा मुद्देमालासह एका अल्पवयीन मुलगा व त्यानुसार प्रकाश धनाजी जाधव (वय- 50, रा. अपशिंगे, ता. सातारा) व नासिर खलीद खान (वय- 38, रा. वर्णे, ता. सातारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक सप्टेंबरला खोजेवाडी (ता. सातारा) येथून राजेंद्र जगन्नाथ घोरपडे यांच्या घराच्या पार्किंगमधून 12 हजार रुपये किमतीची सायकल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बोरगाव पोलिसांत नोंदविली होती. याचा तपास करत असताना सायकल अपशिंगे (मि.) येथील एका अल्पवयीन मुलाने चोरून त्याची विक्री केल्याची माहिती बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. त्यांनी त्वरित गुन्हे शोध पथकाला याबाबत सूचना करत याचा तपास करून शोध घेण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने कारवाई करत अपशिंगे येथून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्याबरोबर असणाऱ्या दोघांची नावे सांगितली.
अल्पवयीन मुलाच्या माहितीवरून प्रकाश जाधव व नासिर खान या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याजवळील एक अॅपे रिक्षा व सातारा शहर परिसरासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून चोरलेल्या 19 सायकलींसह तब्बल 2 लाख 92 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्यासह पोलिस नाईक दादा स्वामी, अमोल सपकाळ, प्रशांत चव्हाण, सुनील कर्णे, अमोल गवळी, पोलिस कॉन्स्टेबल केतन जाधव, विशाल जाधव यांनी केली.