कराड शहराच्या विकासासाठी पालिकेत काॅंग्रेसला एकहाती सत्ता द्या : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड । विशाल वामनराव पाटील
कराड शहरात काही वाढीव भागाचा समावेश झाला असून त्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी टाकण्यात येत आहे. परंतु, कराड पालिकेत एकहाती नेतृत्व नसल्याने विकासकामे खोळंबली आहेत. तरीसुध्दा मी शहराच्या विकासासाठी कटिबध्द आहे, त्यामुळे या परिसराचा विकास करणारच. तसेच कराड शहराच्या विकासासाठी आगामी निवडणुकीत काॅंग्रेसला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड शहरातील एकविरा कॉलनीमधील आरसीसी रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांच्या मागणीनुसार माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 20 लाख रुपये मंजूर केले. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी झाकीर पठाण होते. यावेळी मदार शेख, आल्ताफ मोमिन, शिवराज मोरे, समीर डंगरे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, ऋतुराज मोरे, श्रीकांत मुळे, जितेंद्र ओसवल, अमीर कटपुरे, साहेबराव शेवाळे, शिवराज इंगवले, जावेद नाईकवडी, सलीम बागवान, आदम पठाण, आब्दुल मुल्ला, रफीक शेख, उसमान शेख, आयुब बागवान, आली शेख यांच्यासह काॅंग्रेसचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झाकीर पठाण म्हणाले, कराड ग्रामीण भागाच्या विकासासाठी बाबांनी भरपूर निधी दिला. या ग्रामीण भागाचा शहरात समावेश पृथ्वीराज चव्हाण बाबांनी मुख्यमंत्री असताना केला. या परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार यांच्याएवढा कुणीही दिला नाही. आम्ही जे- जे मागितले, ते- ते आम्हांला मिळाले. त्यामुळे आम्ही कायमच काॅंग्रेस आणि बाबांच्या पाठिशी राहू, अशी ग्वाही देतो. यावेळी सूत्रसंचालन फारूक सय्यद यांनी केले. तर आभार साहेबराव शेवाळे यांनी मानले.