सीटवरून उठला केबिनमध्ये गेला अन् जिवाला मुकला : कराडचा युवक अपघातात ठार
सातारा | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात कराड तालुक्यातील एकजण जागीच ठार झाला आहे. आज शनिवारी (दि. 1 जुलै) पहाटेच्या सुमारास शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. यामध्ये सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा. टाळगाव शेवाळेवाडी, ता. कराड) जागीच ठार झाला असून चारजण जखमी झाले आहेत. पाठीमागील सीटवरून केबिनमध्ये काही कामानिमित्त गेलेल्या सुरजचा अपघातात मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तिलिंग कृपा ही खासगी ट्रॅव्हल्स लक्झरी बस (एमएच क्रं. 01 डीआर 0108) निघाली होती. बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करीत होते. दरम्यान, बस सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावच्या हद्दीत महामार्गावर एका हाँटेलसमोर आली असता एक मालट्रक वळण घेत असताना कंटेनर (एनएल क्रं.01 जी 4069) ला पाठिमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्समध्ये केबिनमध्ये बसलेल्या सुरजचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह चार जण जखमी झाले आहेत.
सूरज शेवाळे हा आपल्या पत्नीसमवेत प्रवास करीत होते. पत्नी मुंबईत कामाला आहेत तर सुरज दुकान चालवतो. माजी सैनिक भिमराव शेवाळे यांचा सुरज मुलगा असून त्यांची आई माजी ग्रामपंचायत सदस्य तर एक भाऊ भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे.
बसमधील अपघातातील जखमींची नांवे पुढीलप्रमाणे :- बसमधील व्यवस्थापक अकुंश बापूसो पाटील (वय 42, रा. पणुंबरे जि. सांगली), प्रवाशी राजश्री अनिल मोरे (वय 29 रा. कराड), शंकर आनंदा बगाडे (वय 45, रा. बत्तीस शिराळा जि.सांगली), अमित महादेव पवार(वय 29, रा. किंद्रेवाडी जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले.