सह्याद्री कृषी महाविद्यालयास शासनाची मान्यता, आजपासून प्रवेश सुरू : आ. बाळासाहेब पाटील
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांची कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व त्यामधील शिक्षण मिळावे यासाठी कारखाना कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे अशी इच्छा होती. त्यांच्या पश्चात कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१३ मध्ये कारखाना कार्यस्थळावर कारखाना संचलित सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी सुसज्ज इमारत, मुला-मुलींच्यासाठी स्वतंत्र वसतीगृहे, अत्याधुनिक प्रयोगशाळा बांधण्यात आली असून त्याकरिता आवश्यक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अलिकडे स्पर्धा परीक्षा मधील कृषी शाखेच्या यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या बघता कृषी महाविद्यालयाकडे मुला-मुलींचे शिक्षण घेण्याचा ओढा वाढलेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रामधूनही कारखाना संचलित कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास संलग्न कृषी महाविद्यालय कारखान्याने सुरू करावे अशी पालक, मुला-मुलींच्याकडून मागणी होत होती. सध्याच्या इमारतीमध्ये येत्या सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षापासून कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने मा. संचालक मंडळामध्ये चर्चा झाली आणि सह्याद्रि कृषी महाविद्यालय सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला. सदर प्रस्तावास शासनाने येत्या सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. प्रथम वर्षासाठी एकूण ६० विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे.
कारखाना कार्यस्थळावर सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन कृषी महाविद्यालयासाठी डिजीटल क्लास रूम, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रात्यक्षिकासाठी शेती, ग्रंथालय बरोबरच तज्ञ शिक्षक वर्ग उपलब्ध करून देणार आहोत. तरी पात्र मुला-मुलींनी प्रवेशासाठी कारखाना कार्यस्थळावरील सह्याद्रि कृषी महाविद्यालयाकडे संपर्क साधावा. व सोमवार दिनांक २१/०८/२०२३ पासून केंद्रीभूत जागेवरील प्रवेश प्रक्रियेसाठी कोल्हापूर येथे शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये सुरू होणाऱ्या प्रवेश कक्षास भेट देवून यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि कृषी महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करावा व संस्था स्तरीय कोट्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन व कॉलेजचे अध्यक्ष मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.