गावातील ‘तो’ रस्ता नोंद झाल्यास सुविधा देण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध : सरपंच पंकज दीक्षित
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे, याची जाणीव निश्चितच आहे. परंतु खाजगी मालक रस्ता देत नाही. त्यातच तो दोन व्यक्तींच्या वादाचा आणि दिवाणी बाबीचा विषय आहे. हा रस्ता 26 नंबरला नोंद नाही. त्यावर शासकीय निधी टाकता येत नाही. यावर वस्तुस्थिती पाहून तहसीलदार मार्ग काढू शकतात. सदरचा विषय ग्रामपंचायत आखत्यारीमध्ये येत नाही. तेव्हा नागरिकांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करून ग्रामपंचायतला दोषी धरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मसूरचे लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित यांनी आज दिली.
मसूर मधील महाकुबाई वार्ड क्रमांक 6 मध्ये नवीन एसटी स्टँड नजीकच्या ग्रामस्थांची समस्या ही गेल्या 20 वर्षापासून आहे. पूर्वीच्या प्रोसिडिंगमध्ये हा रस्ता 26 नंबरला नोंद नाही. त्यामुळे तेथे कुठलाही शासकीय निधी टाकताना अडचण येते. त्यातच जगदाळे व पाटोळे यांच्यात वाद विवाद आहेत. खाजगी मालकाने रस्ता देणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी अटकाव केल्याने मागील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्यांनी जागा घेतल्या त्यांच्या खरेदी पत्रावर पाच फूट रस्ता असल्याची नोंद आहे. त्यांनी तहसीलदार यांना याप्रकरणी वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी. अधिकारी शहानिशा करून त्यांच्या आदेशाने हा रस्ता नोंद होऊ शकतो.
ग्रामपंचायत कोणा खाजगी मालकीच्या जागेतून जबरदस्तीने रस्ता करू शकत नाही. याबाबत जगदाळे व पाटोळे यांनी समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे. सदरील विषय ग्रामपंचायतच्या कक्षेत तूर्त येत नसल्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अडचणी येत आहेत. तेथील नागरिकांनी ही बाब समजून घेणे गरजेचे आहे. तशी सविस्तर वस्तुस्थिती यापूर्वी त्यांना सांगण्यात आली होती. परंतु नागरिकांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करून ग्रामपंचायतीला दोषी धरणे योग्य नाही. तहसीलदारांच्या आदेशाने हा रस्ता ग्रामपंचायतीच्या 26 नंबरला नोंद झाल्यास दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या सर्व समस्या मिटवण्यास ग्रामपंचायत तत्पर आहे. ग्रामपंचायत नागरिकांच्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यास कठिबद्ध असून नागरिकांनी वस्तुस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन सरपंच दीक्षित यांनी केले आहे.